पत्रकार कुटूंबियांच्या हळदी-कुंकू कार्यक्रमाने घट्ट झाले पत्रकार कुटुंबीयांचे स्नेहबंध .समाजाला जपणाऱ्या पत्रकारांना जपणे सामाजिक जबाबदारी — सौ शिलाताई पाटील

मोहन चौकेकर बुलढाणा :
धकाधकीच्या पत्रकार्यामुळे पत्रकारांचा एकमेकांशी कौटूंबिक ॠणानुबध पाहीजे तसा प्रस्थापित होत नाही. म्हणून हा स्नेहबंध खऱ्या अर्थाने घट्ट होण्यासाठी बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने महिला सेलच्या पुढाकारातून बुलढाण्यातील पत्रकारितेच्या इतिहासात पहिल्यांदाच पत्रकारांच्या कुटूंबियांचा हळदी-कुंकू कार्यक्रम झाला. सामाजिक कार्यकर्त्या सौ. शिलाताई पाटील यांनी लोकशाहीला संवर्द्धीत आणि प्रवर्द्धित करणाऱ्या पत्रकारितेचा गौरव करीत समाजाला जपणाऱ्या पत्रकारांना जपणे आपली सामाजिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केले.
बुलढाणा जिल्हा पत्रकार भवन येथे पत्रकारांच्या कुटूंबातील महिला सदस्यांच्या भरगच्च उपस्थितीत विविध मान्यवरांसह कार्यक्रम सजला. पारंपारीक कार्यक्रमाला आरोग्य जागृतीची जोड देण्यात आली होती. ‘धकाधकीच्या आयुष्यात महिलांनी आरोग्य कसे सांभाळावे ?’, या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी डायबिटॉलॉजीस्ट डॉ. अश्विनी जाधव तसेच स्त्रीरोग तज्ञ डॉ. माधवी जवरे यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी मिस ऑलिम्पीया विजेता कु. पौर्णिमा सोनोने यांचा बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ महिला सेलच्या वतीने सहृदय सत्कार करण्यात आला. दीपप्रज्वलन आणि राष्ट्रमाता माँ जिजाऊंच्या पूजनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. जिल्हा महिला सेलच्या अध्यक्षा कु. मृणाल सोमनाथ सावळे यांनी प्रास्ताविकातून पत्रकारांच्या कुटूंबियांची एकमेकांशी ओळख ही गरज असल्याचे म्हटले. पत्रकारांच्या कुटूंबियांनी कर्यक्रमाला केलेली गर्दी म्हणजे कार्यक्रमाचे यश असल्याचेही ती म्हणाली. ‘अनेक प्रॉब्लेमचे मूळ हे पुरेशी झोप न घेणे आहे.. आरोग्य, आहार आणि विश्रांती यापैकी एक गोष्ट जरी असंतुलीत झाली तरी समस्या उद्भभावते असे उद्गगार डॉ. अश्विनी जाधव यांनी काढले. महिलांना आरोग्य सांभाळण्याचा सल्ला देतांना त्या पुढे म्हणाल्या की, अन्नाचा इंधन म्हणून वापर करता आला पाहीजे.. आपले पोट मुठीएव्हढे आहे पण फुग्यासारखे फुगते.. म्हणून कितीही खावू नये.. जगण्यासाठी खायचं की, खाण्यासाठी जगायचं, हे ठरविता आले पाहीजे. डायबेटीस मध्ये जगात प्रथम असणाऱ्या आपण देशवासियांनी जीवनशैली सुधारणे गरजेचे असल्याचे त्यांनी निक्षून सांगितले. डॉ. माधवी जवरे यांनी महिलांना सल्ला दिला की, वयाच्या मानाने आणि खिश्याला परवडेल तो व्यायाम करा. महिलांनी एकमेकींशी मैत्री वाढविली पाहीजे. त्यांचे मानसिक आणि भावनिक व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. शेअरिंग आणि केअरिंग झाले की, मन हलके होते. त्याचा चांगला परिणाम आरोग्यावर होतो, असेही त्या म्हणाल्या. सत्काराला उत्तर देतांना कु. पौर्णिमा सोनोने यांनी आपला संघर्षमय प्रवास सांगितला. ‘स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्याग आणि समर्पणाची तयारी ठेवा’, असा उपदेश यावेळी तिने केला. हळदी-कुंकू कार्यक्रमाला आपल्या प्रभावी शब्दांनी सुत्रसंचालक वैशालीताई तायडे यांनी साज चढविला. तर वैशाली रणजीतसिंग राजपूत यांनी मान्यवरांचे आभार व्यक्त करीत यापुढेही असेच एकत्रीत राहून पत्रकारांच्या कुटूंबांचे संघटन अधिक मजबूत करू, असे आवाहन केले. विशेष म्हणजे पत्रकार सुपुत्री सिद्धी राजेश डिडोळकर हिचा विविध रनिंग स्पर्धांमध्ये पारितोषिक मिळविल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात उखाणे स्पर्धाही झाली. श्रीमती सुरेखाताई सावळे यांनी सहभागी सर्व महिलांना तीळ-गुळाचे वाटप केले. हळदी-कुंकू कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सौ. वैशाली रणजीतसिंग राजपूत , कु. मृणाल सोमनाथ सावळे , सौ. उषा चंद्रकांत बर्दे, सौ. वैशाली नितिन शिरसाट, सौ. गायत्री राजेंद्र काळे, गझल कासिम शेख, सलमाबी वसीम शेख, सौ. वनश्री दिनेश मुडे, सौ. यशस्वी राहुल दर्डा, सौ. वैशाली युवराज वाघ, सौ. किरण ब्रह्मानंद जाधव, सौ. शुभांगी रविंद्र गणेशे, सौ. प्रतिभा शिवाजी मामनकर, सौ. रिना जितेंद्र कायस्थ, सौ. मेघा मयुर निकम, सौ. प्रतीक्षा अजय राजगुरे सौ. ललीता दीपक मोरे, सौ. वैशाली किशोर खंदारे, सौ. सविता प्रेमकुमार राठोड आदिंनी अथक परिश्रम घेतले .