महाराष्ट्र

रश्मी शुक्ला यांची विधानसभा निवडणुक संपताच पुन्हा राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती 

मोहन चौकेकर

महाराष्ट्रात महायुतीचे सरकार सत्तेत येण्यापूर्वीच मोठा निर्णय घेण्यात आला आहे. रश्मी शुक्ला यांची पुन्हा एकदा राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी रश्मी शुक्ला आपला पदभार स्वीकारणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने पदमुक्त केलं होतं. आता पुन्हा त्यांना सेवेत दाखल करून घेण्यात आलं आहे.

राज्यातल्या काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षनेत्यांचे फोन टॅपिंगचा आरोप असलेल्या रश्मी शुक्लांना निवडणुकीच्या काळात पदावरून हटवण्यात आलं होतं. काँग्रेसने केलेल्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला होता. त्यानंतर राज्याच्या पोलिस महासंचालकपदी संजय कुमार वर्मा यांची नियुक्ती केली होती. पण त्यांच्या नियुक्तीमध्ये तात्पुरती नियुक्ती असा शब्द वापरण्यात आला होता.

विधानसभा निवडणुकीचा निकाल महायुतीच्या बाजून आला असून राज्यात आता महायुतीचं सरकार येणार आहे. त्यामुळे निकाल लागल्यानंतर लगेचच रविवारी संध्याकाळी रश्मी शुक्ला यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. त्यानंतर आता रश्मी शुक्लांची पुन्हा एकदा पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली.

कोण आहेत रश्मी शुक्ला?
रश्मी शुक्ला या 1988 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी असून महाराष्ट्र पोलिसांच्या सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांपैकी त्या एक आहेत. रश्मी शुक्ला यांनी भूगर्भशास्त्र या विषयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. वयाच्या 22 व्या वर्षी त्या यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्या. 2005 रश्मी शुक्ला यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले होते. 2008 मध्ये त्यांची महाराष्ट्र सरकारमध्ये समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

सन 2013 मध्ये, रश्मी शुक्ला यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक देऊन गौरविण्यात आले. 2014 ते 2019 या काळात रश्मी शुक्ला यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले.

सन 2014 ते 2019 या काळात रश्मी शुक्ला या राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या. त्यावेळी काँग्रेसचे नाना पटोले यांच्यासह अनेक जणांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.

आमच्या व्हाटसअप ग्रुप ला जॉइन व्हा

रश्मी शुक्ला या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती होणार्‍या पहिल्या महिला ठरल्या होत्या. राज्याच्या पोलीस महासंचलाकपदी नियुक्ती होण्यापूर्वी रश्मी शुक्ला या केंद्रात सशस्त्र सीमा दलाच्या (SSB) केंद्र प्रमुख म्हणून कार्यरत होत्या. जून 2024 मध्ये त्या निवृत्त होणार होत्या. मात्र, राज्य सरकारने त्यांना मुदतवाढ दिली होती. रश्मी शुक्ला यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणूनही काम पाहिले आहे. 

शेअर करा.ग्रुप मध्ये पोस्ट करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!