महाराष्ट्र

प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन; अमेरिकेत घेतला अखेरचा श्वास

मुंबई- प्रतिनिधी

आपल्या जादुई तबला वादनाने जगभरातील संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणारे प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं आज निधन झालं आहे. ते ७३ वर्षांचे होते. मागच्या काही वर्षांपासून हृदयविकाराशी झुंजत असलेल्या झाकीर हुसेन यांची प्रकृती बिघडल्याने आज सकाळी त्यांना अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र तिथेच त्यांनी उपचारांदरम्यान अखेरचा श्वास घेतला.

झाकीर हुसेन यांचा जन्म 9 मार्च 1951 रोजी मुंबईत झाला. उस्ताद झाकीर हुसेन यांना 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण आणि 2023 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते. त्यांच्या जाण्याने भारताच्या कलाक्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. झाकीर हुसेन यांना तीन ग्रॅमी पुरस्कारही मिळालेले होते. त्यांच्या वडिलांचे नाव उस्ताद अल्लाह राखा कुरेशी आणि आईचे नाव बीवी बेगम होते. झाकीर यांचे वडील अल्ला राख हेही तबलावादक होते. झाकीर हुसेन यांचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील माहीम येथील सेंट मायकल हायस्कूलमध्ये झाले. याशिवाय मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधूनही पदवीचे शिक्षण घेतले. झाकीर हुसैन यांनी वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी अमेरिकेत पहिला कॉन्सर्ट केला होता. 1973 मध्ये त्यांनी त्यांचा पहिला अल्बम ‘लिव्हिंग इन द मटेरियल वर्ल्ड’ लाँच केला

सुरुवातीच्या काळात उस्ताद झाकीर हुसेन रेल्वेने प्रवास करायचे. पैशाअभावी ते जनरल कोचमधून प्रवास करत. जर त्यांना जागा मिळाली नाही तर ते जमिनीवर वर्तमानपत्र पसरवून झोपायचे. या काळात तबल्याला कोणाचाही पाय लागू नये म्हणून तो त्याच्या पोटाशी तबल्याला घेऊन झोपायचे. झाकीर हुसेन हे 12 वर्षांचे असताना ते वडिलांसोबत एका कॉन्सर्टला गेले होते. पंडित रविशंकर, उस्ताद अली अकबर खान, बिस्मिल्ला खान, पंडित शांता प्रसाद आणि पंडित किशन महाराज या संगीत दिग्गजांनी त्या मैफलीला हजेरी लावली होती. झाकीर हुसेन वडिलांसोबत स्टेजवर गेले. परफॉर्मन्स संपल्यानंतर झाकीर यांना 5 रुपये मिळाले. एका मुलाखतीत याचा संदर्भ देत ते म्हणाले होते की, मी माझ्या आयुष्यात खूप पैसे कमावले आहेत, पण ते 500 रुपये माझ्यासाठी अमूल्य ठेवा आहे. उस्ताद झाकीर हुसेन हे पहिले भारतीय संगीतकार आहेत, ज्यांना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाईट हाऊसमध्ये जागतिक मैफिलीसाठी आमंत्रित केले होते.

शेअर करा.ग्रुप मध्ये पोस्ट करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!