कुख्यात गुंड बाळा वाघेरेला अटक, राहत्या घरी धाड मारून घेतले ताब्यात..Notorious gangster Bala Waghere arrested, house raided and detained.
आवाज न्यूज : पिंपरी चिंचवड प्रतिनिधी, १८ मार्च.
मागील काळात शहर परसरातील गुन्हेगारीवर एक हाती सत्ता गाजवणाऱ्या बाळा वाघेरे याला पोलिसांनी राहत्या घरातून उचलले. त्यामुळे गुन्हेगारी विश्वात एकच खळबळ उडाली. पैशाच्या व्यवहारातून वाघेरे याने एकाचे अपहरण केल्याची तक्रार आल्यानंतर बुधवारी दि. १५ रोजी चिंचवड पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी २९ वर्षीय व्यावसायिकाने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बाळा वाघेरे (रा. पिंपरीगाव), राहुल उनेचा, हरीश चौधरी (दोघे रा. वाल्हेकरवाडी) यांच्यासह अन्य एका अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी चौधरी यांच्यात आर्थिक व्यवहार झाला होता. फिर्यादी यांनी व्यवहारातील सर्व रक्कम चौधरी याला माघारी दिली आहे. मात्र, तरी देखील आरोपी फिर्यादी यांच्याकडे पैशाची मागणी करीत होते.
दरम्यान, बुधवारी आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांचे अपहरण करून त्यांना आरोपी बाळा वाघेरे यांच्या घरी नेले. तेथे नेल्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्याकडे सात लाख रुपयांची खंडणी मागितली. फिर्यादी यांनी नकार दिला असता आरोपींनी त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी यांनी पैसे देतो, असे सांगून तेथून स्वतःची सुटका करून घेत थेट पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी देखील तक्रारीवरून बाळा वाघेरे याला राहत्या घरातून ताब्यात घेतले. मागील काही वर्षापासून अंडरग्राउंड असलेल्या बाळा वाघेरे याला पोलिसांनी अशाप्रकारे धाड मारून उचलल्याने गुन्हेगारी विश्वातील अनेकांचे कान टवकारले आहेत.